आयुष्याची पालखी आपल्या विठ्ठलाच्या शोधात
दरवर्षी
माऊलीं-तुकोबांची पालखी
आळंदी-देहूहून पंढरपूरास निघते. प्रत्येक जण आपल्या विठ्ठलाशी
असलेले आपले अदृश्य नाते जोडण्यासाठी प्रत्येक व्यक्ती विठ्ठलाकडे धाव घेत असतो. लहान-थोरांपासून , गरीब-श्रीमंत जात-पंथ-धर्म अशी कोणतीच दरी-भेदभाव न मानता दरवर्षी वारी पायी चालत जाते. चालणा-या
पायांना पांडूरंगाची ओढ असते. विठ्ठलाशी
असलेले नाते अधीक घट्ट करण्यासाठी राज्यभरातून-देशभरातून जनसागर पंढरीकडे झेपावतो.
चंद्रभागेला भरतीच येते जणू माणसांची...
आपल्या सहस्त्रावधी पावलांनी
पांडूरंगाच्या पायाला स्पर्श करण्यासाठी
हा जनसागर पंढरीकडे धावत असतो. आसपासच
वातावरण भक्तीरसात चिंब करत हा पुढे पुढे सरकत असतो.
माऊलींची, तुकारामांची पालखी पंढरपूरकडे जात असते. पालखीत लाखो लोक विठ्ठलाच्या
नामाचा जयघोष करत पुढे जात असतात. पालखी
सर्वांना सामावून घेत पुढे जात असते. पण एवढं सगळं घडत असताना एकमेकाच्या
खांद्याला खांदा लावून चालत असतानाही प्रत्येकाचा पांडुरंग वेगळा असतो. प्रत्येक
जण आपल्याला हवा असणारा, आपल्या मनातला
पांडुरंग त्या वारीत शोधत असतो. प्रत्येकाला हवा असणारा पांडुरंग वेगळा आहे. तरीही सगळे
चालत राहतात, तेही एकत्रितपणे... तसचं आपलं आयुष्य सुद्धा एक पालखी आहे. प्रत्येकाचे
ध्येय, उद्दिष्ट वेगळे असते. संपूर्ण आयुष्य सोबत जगूनही
अनेकांना आपल्या जीवनाचे सूर सापडले असतीलंच असे म्हणता येत नाही. दिडींच्या
वाटेवरून जाताना अनेकांना आपला विठ्ठल सापडतोच असे नाही, पण
तरीही दिंडी मात्र सुरू असते. अव्याहतपणे एकमेकांना सोबत घेऊन...
दिंडीत चालताना एखाद्याला वाटत असेल, पंढरीची वाट गवसली, पण
समोर विठ्ठल दिसत नाही. मग पंढरपूरची वाट हरवल्यासारखी जाणीव
होत असेल. पण तरीही पावले चालत राहतात. कोणत्यातरी एखाद्या अनामिक
उर्मीने, न थांबता. आयुष्याच्या दिंडीत सुद्धा एखाद्या वळणावर अचानकपणे अनेकदा वाट हरवल्या सारख वाटतं. मला नक्की काय करायचंय, मी कुठं चाललोय, आयुष्य भरकटत तर चालले नाही ना...
रस्ता की ध्येय, तत्त्व की पैसा. प्रश्नांची अशी एक न
संपणारी मालिका उभी राहते आणि मग चूक काय आणि बरोबर काय, हा
प्रश्नच मागे पडतो. मनाच्या वादळात सापडून विवेक पाचोळ्यासारखा उडून जातो आणि
हाती राहतं आपलं आशाळभूतपणे जगत राहणं... तरीही आयुष्याची दिंडी स्वतःच्या
खांद्यावर घेऊन चालत राहावं. अगदी पंढरपूरकडे एखाद्या अनामिक ओढीने निघालेल्या
वारकरी जसा नामाचा जयघोष करत चालत राहतो. तसाच वाट चुकलेल्या जहाजाप्रमाणे सुरू
असलेला आयुष्याचा प्रवास चालूच ठेवावा, विठ्ठलाच्या
दर्शनासाठी निघालेल्या असंख्य वारकर्याप्रमाणे... तोपर्यंत... जोपर्यंत, आपल्या आयुष्याचा विठ्ठल सापडत नाही, तोपर्यंत....
-प्रविण रघुनाथ काळे
मो-८३०८७९३००७
प्रकाशित – दै. प्रभात, १८ जुलै २०१८
|
0 Comments