आयुष्याची स्पर्धा - परिक्षेच जगणंं


काही दिवसापुर्वीची गोष्ट. एक बातमी वाचली होती. पुण्यातल्या एका क्लासच्या प्रवेशासाठी रात्रभर रांग लागली होती. जवळपास पहाटे तीन पर्यंत विद्यार्थी रांगेत उभे होते. नंतर काही दिवसानंतर त्या रांगेत थांबून प्रवेश मिळवलेल्या एका भाग्यवान विद्यार्थ्याला भेटण्याच परमभाग्य लाभल. क्लासला प्रवेश मिळवण्याचा किस्सा सांगताना तो मला म्हणाला, अरे तब्बल XXX तास थांबून अॅडमिशन मिळाली आहे. यावर्षी पोस्ट नक्की मिळवणार. एकंदरीत हा प्रसंग वाचला कि सुज्ञ लोकांना समजल असेलच, हा विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी होता. त्याने कितीतरी तास रांगेत थांबून प्रवेश मिळवला होता आणि आता तो लवकरच अधिकारी होणार होता (असा त्याचा विश्वास होता). खरतरं माझ्यासाठी ही आनंदाची गोष्ट असायला हवी होती. माझा एक मित्र लवकरच अधिकारी होणार होता. पण तसं काही होत नाही.

पुण्यात येवून जवळपास दहा वर्ष होवून गेली. मागच्या दहा वर्षात स्पर्धा परीक्षा करणारे अनेक मित्र मिळाले. पण त्यातले खूपच कमी मित्र अधिकारी झाले. आजघडीला पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी येणाऱ्या पोरांची संख्या लाखोंच्या घरात आहे. पण त्यातून अधिकारी होणाऱ्यांची संख्या  हजारोंच्या मध्ये आहे. या चाळणीतून बाहेर पडणाऱ्या बाकीच्याच कायहा प्रश्न मात्र कायमच अनुत्तरीत असतो. याची उत्तरही कधी तरी शोधावी लागणार आहे.

स्वप्नाच्या पाठीमागे...
    
मी अकरावीला होतो. पुण्यात आल्यानंतर अनेक कार्यक्रमाला जायची सवय लागली होती. त्यावेळी अश्याच एका कार्यक्रमाला गेलो होतो. कार्यक्रमाच्या हॉलमध्ये गेलो आणि पाहिलं तर हॉल मध्ये उभे राहायला देखील जागा नाही. एका कोपऱ्यात उभा राहिलो. समोर दोन-चार वर्षापूर्वी अधिकारी  झालेला एक व्यक्ती त्याच्या जीवनाचा संघर्ष सांगत होता. तासभर अगदी तो किती संघर्षातून अधिकारी झाला. त्याचं आवेशपूर्ण भाषण ऐकल. शेवटी जाता जाता त्याने सांगितलं, “मी अधिकारी होवू शकलो, तर तुम्ही का नाही ?” त्याक्षणी डोक्यात विचार आलाही होता . आपणही अभ्यासाला सुरुवात करायला पाहिजे (केली नाही ही चांगली गोष्ट). चांगला अभ्यास केला तर अधिकारी होवू. अस त्यावेळी वाटलं होत. कार्यक्रम संपला, बाहेर पुस्तकांचे स्टोल लावले होते. दोन-चार पुस्तकही खरेदी केली. माझ्यासोबत त्या कार्यक्रमात असणाऱ्या जवळपास सगळ्यांनीच पुस्तके विकत घेतली असतील. एकाच दिवशी हजारो पुस्तकाची विक्री...

सोशल मिडीयाच्या या जमान्यात अश्या वक्त्यांची भाषणे फेसबुक, युट्यूब, व्हाटस अप वरून लाखो लोकांनी पहिली. ते ऐकता ऐकता अनेकांच्या डोक्यात अधिकारी होण्याच स्वप्न रुजलं गेल. डोक्यात हे अधिकारी होण्याच स्वप्न घेवून पुण्यासारख्या शहरात येणाऱ्यांची संख्या आजघडीला लाखोंच्या घरात आहे. शहरात येण्यापूर्वी डोक्यात खूप मोठी स्वप्न असतात. हळूहळू स्वप्नाचा पाठलाग सुरु होतो. पण संपत नाही.

सुरुवातीला डोक्यात साधी अपेक्षा असते. एखाद-दोन वर्ष अभ्यास करायचा. हातात एखादी पोस्ट असेल. मग सगळ जग आपल्या पायाशी... सुरुवात होते एखाद-दोन वर्षाची पाच सहा वर्ष होतात. तरीही पोस्ट मिळत नाही. IAS व्हायचं म्हणून सुरुवात केलेली असते पण शेवटी एखाद्या छोट्या मोठ्या पोस्टची अपेक्षा असते तीही पूर्ण होत नाही. मग हळूहळू परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसते. कारण सांगताना परिस्थती, सरकार, समाज या सगळ्यावरती खापर फोडण्यास सुरुवात होते.

उमेदीच्या वर्षाच काय ?
 
मागच्या काही दिवसापुर्वी एक लेख वाचण्यात आला होता. त्यात सदर लेखकाने लिहिले होत ‘‘जर तुम्हाला तुमच्या शत्रूचं वाईट करायचं असेल तर त्याला विश्‍वासात घ्या, त्याला वाय-फायवरून फुकट डाऊनलोड केलेल्या प्रेरणादायी व्हिडीओ दाखवा. त्यानंतर त्याला अधिकारी होण्याचे पाच पन्नास फायदे  सांगा आणि तुम्ही हे सगळ सांगितलं कि तो स्पर्धापरीक्षेच्या नादाला लागतो आणि  मग आपल्या आयुष्याची आठ-दहा वर्षे त्यात खर्च करतो. हा लेख माझ्या वाचनात आला. त्यानंतर यावर मी खूप विचार केला. कारण चांगल्या फिल्ड मधून पदवीधर असणारे आणी त्याही पेक्षा अवघड म्हणजे हातात एखादी चांगली नोकरी असणारे पोरही स्पर्धा परीक्षेच्या मागे धावायला सुरुवात करतात. चार-पाच वर्ष संघर्ष केल्यानंतर हातात काहीच नाही, लागलेली नोकरीही सोडलेली असते. मग कधी होणार अधिकारी अश्या स्वरूपाचे प्रश्न मित्रमंडळी, पाहुणे विचारायला सुरुवात झाली असते. पण सांगायला काहीच उत्तर नसते.  मग यातून  हळूहळू नैराश्य यायला सुरुवात होते.

आयुष्याची उमेदीची महत्वाची चार दोन वर्षे स्पर्धा परीक्षेच्या मागे धावून, अधिकारी बनण्याच्या  स्वप्नासाठी कुरबान झाली आहेत. याची जाणीव व्हायला  खूप वेळ लागतो. पण त्यांनतर हातात काहीच नसते. यावर विचार करावाच लागणार आहे. कारण आजकाल  फक्त विद्यार्थीच नाही तर त्यांच्या पालकांनाही त्याची लागण झाली आहे. कुठेतरी दूरच्या नात्यातला तो अधिकारी झाला, मग आमचाही पोरगा-पोरगी अधिकारी बनली पाहिजे. यासाठी पालकही हात धुवून पोरांच्या मागे लागले आहेत. दहावीची परीक्षा ढकलत पास झालेल्या पोराच्या घरच्यांचेही स्वप्न असते (स्वप्न असणे गैर नाही, पण आपली कुवत ओळखता आली पाहिजे) आपला मुलगा अधिकारी झाला पाहिजे. अधिकारी बनण्यासाठी मार्गदर्शन आवश्यक असते मग त्यासाठी त्याला भरमसाठ फी भरून क्लास लावला जातो. हजारो रुपयांची पुस्तकांची खरेदी केली जाते. अभ्यासाला वातावरण हवे म्हणून लायब्ररी लावली जाते. पालकांच्या याच स्वप्नाचा फायदा घेवून अनेक उद्योजक तयार झाले.

स्वप्नाचा  बाजार...
        
स्पर्धा परीक्षा करायची ठरवली कि पोरगा पुण्यात येतो. राहण्यासाठी जागा शोधतो, त्यातही ती जागा  स्पर्धा परिक्षेचे वातावरण असलेल्या ठिकाणी हवी. मग तशी जागा शोधली जाते. अभ्यासाला वातावरण हवे म्हणून अभ्यासिका लावली जाते. योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी चांगला क्लास लावला जातो. सोबतीला पुस्तके, मासिके आणि महितीसाठी रोजचा पेपर. आता दीड जीबी इंटरनेट फ्री झाल्यामुळे अभ्यास सुद्धा ऑनलाईन झाला आहे. मग ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी मोबाईल सुद्धा चांगला हवा. अशी ही लिस्ट खूप मोठी होत जाते. प्रत्येकजण आपल्या कुवतीनुसार ही लिस्ट वाढवत नेत राहतो. मग या सगळ्या सुविधा पुरवण्यासाठी नवे सर्विस प्रोव्हायडर तयार  झाले. आपलीच सर्विस कशी चांगली याची जाहिरात करायला लागले आणि डोक्यात एक स्वप्न घेवून यात उतरलेल्या पोरांचा आणि त्याच्या पालकांच्या स्वप्नाचा बाजार झाला.

पुण्याच्या रस्त्यावरून फिरताना क्लासेसची रांग दिसत राहते. क्लासेसच्या मालकीची  मोठी साम्राज्य उभी राहिलेली दिसतात. ही या पोरांच्या जीवावरच. क्लासेसवाले पहिल्यांदा मोफत व्याख्यानमालांमधून पोरांना आकर्षित करतात, मग व्याख्यानमालेला आलेल्या पोरांना तुम्हाला अधिकारी होण्यासाठी आमच्या क्लासची गरजच आहे. अश्या प्रकारचं मार्गदर्शन केल जात. क्लासला भरमसाठ फीस आकारली जाते. इतकी भरमसाठ फीस आकारून क्लास मध्ये काय शिकवलं जात. हा सुद्धा चर्चेचा विषय आहे. त्यातही पुण्यात इतके क्लास आहेत. त्यातून बाहेर पडणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे .मग याचा सक्सेस रेशो किती आहे ? याचाही विचार करावा लागणार आहे. या क्लासवाल्या लोकांचही अर्थशास्त्र मांडायची गरज आहे. त्यातही अलीकडे सगळ्या क्लासवाल्या लोकांनी स्वतःच्या प्रकाशन संस्था काढल्या आहेत. स्वताची पुस्तके, मासिके काढून त्याची विक्री देखील जोरात होते आहे. या सगळ्याच्या माध्यमातून त्यांनी कोट्यावधी रुपये कमावले. पण स्वप्नाच्या मागे धावणाऱ्या पोरांच्या हाती काय आहे. याचाही विचार करावा लागणार आहे.

दुसरीकडे क्लासच्या जाहिरातींना गावातून शहरात येणारा विद्यार्थी बळी पडत राहिला. आजघडीला कोणत्याही परीक्षेचा निकाल जाहीर झाला कि आमच्या क्लासचे इतके विद्यार्थी पास झाले. प्रत्येक क्लास आपला आकडा इतर क्लास पेक्षा जास्त आहे अस सांगत असतो. पण सगळ्या क्लासच्या पास झालेल्याची एकत्रित संख्या मोजली तर ती पास झालेल्या एकूण संखेच्या पाच-दहा पत तर नक्कीच भरेल. इतके हे आकडे फुगवलेले असतात. पण या फुगवलेल्या आकड्यात सामान्य विद्यार्थी अडकत जातो.

पोरगा स्पर्धा परीक्षेच्या तयारीला पुण्यात आला कि त्याला  क्लास सोबत लायब्ररी, मेस अश्या पूरक गोष्टी पुरवणारेही सर्विस प्रोव्हायडर तयार झाले. आज फक्त पुण्यात लायब्ररीची संख्या मोजली तर ती हजारोच्या घरात जाईल. एका पोरामागे कमीत कमी ५०० ते १२००-१५०० पर्यंत फीस आकारणाऱ्या लायब्ररी पुण्यात  चालतात. सोबत चहा-मेस बाकीच्या इतर गोष्टीचा विचार करता एक गोष्ट विसरता कामा नये, या सगळ्या बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवावर शहरात मार्केट उभी राहिली.

अर्धवट भविष्याच काय ?
           
मागच्या काही वर्षात स्पर्धा परीक्षेच्या या विश्वात  मोठ्या प्रमाणात भर पडत राहिली आहे पण बाहेर पडणाऱ्यांची संख्या मात्र फार कमी आहे. त्यातही सरकारी पातळीवरून निघणाऱ्या पदांची संख्या देखील फारच कमी आहे. त्यामुळे  ही तुट कशी भरून निघणार ? यावर उत्तर नाही. त्यातही आजकाल सगळ्याच क्षेत्रामधून शेवटी स्पर्धा परीक्षेकडे येणारा वर्ग मोठा आहे. अगदी बीए पासून इंजिनीअरिंग, मेडिकल पर्यंत सगळ्याच फिल्ड मधून पोरांचा ओघ स्पर्धा परीक्षेकडे वाढतो आहे. ही संख्या फार मोठी आहे. शेवटी मागणी आणि पुरवठा याचं गुणोत्तर बदलत चालले आहे. याचाही विचार करावाच लागणार आहे.

इंजिनीअरिंग-मेडिकल केल्यानंतर पुन्हा स्पर्धा परीक्षेच्या विश्वात प्रवेश करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. इंजिनीअरिंग केल्यानंतर जॉबची वानवा आहे, मग काहीतरी करतोय यासाठी स्पर्धा परीक्षा म्हणून येणारी संख्याही वाढली आहे. इंजिनीअरिंग-मेडिकल केलेल्याच्या मागे निदान  त्यांच्या फिल्डची जॉब सिक्युरिटी असते. पण स्पर्धा परीक्षाच करायची म्हणून बीए करायचं आणि पदवीची तीन वर्षे अभ्यास करायचा अस ठरवून बीए करणारी बरीच मुले आहेत. बीए पूर्ण होत, तरीही अभ्यास सुरूच असतो. सोबतीला पुढे एमए देखील पूर्ण होत पण अभ्यास संपत नाही. हातात काहीच  नाही, मग जगण्याचाच संघर्ष सुरु होतो. अशी कितीतरी मुले आज पुण्यात सापडतील, जी पुण्यात आली स्पर्धा परीक्षा करून अधिकारी बनण्यासाठी पण आज कुठेतरी नोकरीच्या शोधात किंवा काहीतरी छोटा मोठा कामधंदा करत आहेत. पोरगा  अधिकारी बनेल अशी अपेक्षा ठेवून बसणाऱ्या त्याच्या घरच्याचं काय ? हाही प्रश्न आहेच कि.

आज घडीला संपूर्ण देशभरात १० लाखाहून अधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत. त्यात दरवर्षी नवीन काही हजारोंची भर पडत आहे. यातून पास होवून अधिकारी होणाऱ्यांची संख्या  मात्र हजारात आहे. मग  या स्पर्धेतून बाहेर पडलेले नक्की काय करतात ? याचाही विचार करावा लागणार आहे. परीक्षा पास न झाल्यास त्या ज्ञानाचा वापर नक्की काय होतो. याचाही विचार करावा लागेल. भारतात चार लाख खेडी आहेत. आजघडीला स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासलेल्या ज्ञानाचा वापर जर गावांचा विकासासाठी केला तर देश सुधरेल अस म्हणता येईल. पण हे अस होत नाही. पण हे अस घडत नाही.

आज नाही तर उद्या पण यावर बोलाव लागेल, चर्चा करावी लागेल. कारण या सगळ्या स्वप्नाचा पाठलाग करताना खूप मोठा तरुण वर्ग आपल्या आयुष्याची दिशा हरवून बसला आहे. आपल्या मधील अवगत कला-गुणांचा बळी देवून अधिकारी बनण्याच्या स्वप्नासाठी धावत राहतो. स्वप्नाच्या मागची ही शर्यंत कधीपर्यंत ?

- प्रविण रघुनाथ काळे
मो - ८३०८७९३००७

0 Comments