शेतकरी संघटना भूत, वर्तमान आणि भविष्य - खासदार राजू शेट्टी यांची मुलाखत

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांची "शेतकरी संघटना भूत- वर्तमान आणि भविष्यया विषयावर "पारंबी दिवाळी विशेषांका"साठी प्रविण रघुनाथ काळे यांनी घेतलेली मुलाखत...

प्रश्न - आपल्या कुटुंबाला कसलीही राजकीय व चळवळीची पार्श्वभूमी नसताना आपण शेतकरी संघटनेशी कसे जोडले गेलात ?
उत्तर - मी शेतकरी कुटुंबातला असल्यामुळे, माझ बालपण शेतातच गेले. माझे वडील गावापासून दीड किलोमीटर  अंतरावर शेतातच घर बांधून राहात होते. त्यामुळे शाळेव्यतिरिक्तचा बालपणचा पूर्ण वेळ शेतातच जायचा.  त्यामुळे शेताबद्दल एक आकर्षण होत. पण तरीसुद्धा आपण भविष्यात शेती करायची किंवा शेतकरी व्हायचं अस काही निश्चित नव्हते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अचानक वडिलांचे निधन झाल्यामुळे शेतीकडे कोणीतरी लक्ष देणे आवश्यक वाटले. त्यामुळे मी स्वताहून शेतीत लक्ष घालण्याचा निर्णय घेतला. याच कारण मुळातच माझा स्वभाव भांडखोर असल्यामुळे , कुठेतरी जावून नोकरी करण्यापेक्षा शेतात मालक होवून काम करणे केव्हाही चांगले. पहिल्यापासून मला मराठी साहित्याची आवड असल्यामुळे, ग्रंथालय चळवळीचा कार्यकर्ता असल्यामुळे शिक्षण करता करता चळवळीचेही काम करत होतो. मराठी साहित्य, इतिहास याच्याशी माझा लळा होता. त्यामुळे  अस वाटल कि व्यवसायात आपल्याला नवनिर्मितीचा आनंद घेता येईल.  त्यामुळे स्वच्छेने मी शेती व्यवसाय निवडला.
शेती व्यवसाय करता करता त्याच्यातली दाहकता, शोषण, शेतीचे परावलबित्व म्हणजे निसर्गावर अवलंबून असणे. या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यामुळे कुठेतरी अस वाटल कि या सगळ्या गोष्टी बदलल्याशिवाय शेती व्यवसाय शाश्वत होणार नाही. अस वाटल्यामुळे मी चळवळीत ओढला गेलो. शरद जोशीच्या सहवासात गेल्यानंतर शेतीचे होणारे शोषण शास्त्रशुद्ध पद्धतीने समजावून घेता आल आणि त्यातूनच मग आक्रमक, बंडखोर स्वभाव असल्यामुळे पुढे होवून काम करण्याची तयारी असल्यामुळे कधी कार्यकर्त्याचा नेता झालो कळल नाही.

प्रश्न - आजच्या नव्या पिढीला जुनी शेतकरी संघटना आणि त्यांची आंदोलने काही विशेष अशी माहिती नाही, त्यांच्या साठी यावर तुम्ही थोडक्यात कसा प्रकाश टाकाल ?
उत्तर - शेतकरी संघटनेबद्दल सांगायचं म्हटलं तर शेतकरी संघटना हि प्रामुख्याने शेतकऱ्यासाठी आहे, त्यात शेतकरी असतील, शेतमजूर असतील. किंवा शेतीवर अवलंबून असणारे व्यावसायिक असतील म्हणजे शेती व्यवसायाशी ज्यांचा ज्यांचा सबंध येतो. त्यांच्या साठी काम करणारी हि संघटना आहे. ह्याच्या मध्ये प्रामुख्याने सरकारकडून आम्हाला मेहरबानी नको. दया नको फक्त आमचं शोषण नको हि आमची भूमिका आहे. आमच्यावर जबरदस्ती नको. व्यवसाय स्वतंत्र हवे, बाजारपेठेचे स्वातंत्र्य हवे. प्रक्रियेचे स्वातंत्र्य हवे. पण दुर्दैवाने ते मिळत नाही. म्हणून आम्हाला लढे उभे करायला लागतात.

प्रश्न - शरद जोशी यांची ८० च्या दशकातील शेतकरी संघटना आणि आजची शेतकरी संघटना यामध्ये कितपत साम्य आणि फरक आहे , असे आपल्याला वाटते ?
उत्तर - मुळ विचार केला तर दोन्ही मध्ये साम्य आहे. पण एखाद्या विचारसरणीची अंमलबजावणी करताना कशी करायची या संदर्भात धोरणात फरक असू शकतो. उदाहरनार्थ साम्यवादी विचारसरणीचे अनेक संघटना आहेत. त्यात मार्कवादी कम्युनिस्ट असतील भारतीय कम्युनिस्ट असतील. इंडियन सोशालिस्ट, फोरवर्ड ब्लोक असतील पण त्याचा मूळ विचार हा साम्यवादी विचार हाच आहे. त्याच पद्धतीने शरद जोशी यांची संघटना आणि इतर संघटना यांचे मूळ विचार एकच असले तरीसुद्धा अंमलबजावणीच्या स्वरुपात फरक असल्यामुळे त्यात वेगवेगळे प्रवाह यात निर्माण झाले आहेत.

प्रश्न - शेतकरी संघटना स्थापन होवून जवळपास ४ दशके होत आली तरी अजूनही शेतकर्याचे मुलभूत  प्रश्न तसेच आहेत, या मध्ये शेतकरी संघटना आणि शेतकरी नेते कुठे कमी पडले ? याबाबत तुम्हाला काय वाटते ?
उत्तर - यात शेतकरी संघटनानी काहीच केल नाही अस म्हणता येणार नाही. पण शेतकऱ्यांचे प्रश्न हे हजारो वर्षापासूनचे आहेत. कारण शेतीच्या लुटीवरच मानवी समाजाचा विकासाचा डोलारा उभा आहे. अश्मयुगातून ज्यावेळी माणूस शेतीमध्ये आला. त्या काळी माणसाची संपती तीन गोष्टीत मोजली जायची. एक माणसाकडचा अन्नधान्य आणि चार दोन त्याच्या कडची जनावरे आणि त्याच्या कडच्या स्त्रिया. त्या नंतरच्या काळात संपत्तीच्या स्पर्धेत शस्त्रच्या बळावर लुटीमारीस सुरुवात झाली. त्यावेळी सरक्षनाच्या बदल्यात विशीष्ट खंडणी देवून सुरक्षेची हमी घेतली जावू लागली आणि यातून सत्ता केंद्र निर्माण झाली. त्यामुळे शेतकऱ्याच्या लुटीवरच मानवी संस्कृती उभी आहे. त्यामुळे गेल्या हजारो वर्षाचा शेतकऱ्याच्या शोषणाचा इतिहास असताना फक्त चाळीस वर्षात शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील. हि कल्पना चुकीची आहे. तरीसुद्धा १९८० नंतर यात मोठे बदल झाले आहेत.
पूर्वी लोकांना वाटायचे, सरकारला लेवी देतो ते आपले कर्तव्यच आहे. आपल्याला ते द्यावच लागेल. जुन्या काळी हि लेवी सुद्धा वाजत गाजत दिली जायची. आणि पहिल्यांदा शरद जोशी यांनी सिद्धांत मांडला कि लेवी हि खंडणी आहे. हि वाजत गाजत नाही तर याला विरोध केला पाहिजे. आणि हळूहळू हि प्रथा नष्ट झाली. आणि या लेवीचा शेवट रंगराजन समितीने केला. लेवी सारखी जाचक पद्धत शेतकरी संघटनेच्यामुळे संपुष्टात आली. हे शेतकरी संघटनेच यश मानता येईल. दुसरीकडे शेतकऱ्यांचे नेतृत्व करणारे गावात येवून म्हणायचे. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि हेच लोक शहरात जावून मोर्चे काढून धान्य स्वस्त करा असे म्हणायचे. आणि हा दांभिकपणा शेतकरी संघटनेने उघडकीस आणला. त्याच बरोबर दुसरीकडे मराठी साहित्यात, चित्रपटसृष्टीत जमीनदार हा अत्याचार, अन्याय करतो. अस रंगवलेले दाखवले जात होते. पण शेतकर्यांच खर चित्र लोकंच्या नजरेसमोर आणण्यात शेतकरी संघटनेला यश आले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या वाट्याला आलेले दारिद्र्य पूर्व जन्माच पाप आहे. अस मानणाऱ्या शेतकऱ्याला जाग करण्याचे काम शेतकरी संघटनेने केले. भिक नको, हवे घामाचे दामअस ताठ मानेने बोलायला शेतकरी शिकला हे महत्वाचे परिवर्तन गेल्या चाळीस वर्षात शेतकरी संघटनेमुळे झाले आहे.

प्रश्न -  शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेची महिला आघाडी स्थापन करून ग्रामीण महिलांचे प्रश्न हाताळले होते, शेतकरी संघटनेच्या या प्रयत्नातून ग्रामीण महिलाचे प्रश्न सुटले का ? आज शेतकरी संघटनेचे दुर्लक्ष झाले असे आपणास वाटते का ?
उत्तर - आमची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची महिला आघाडी आहे. आम्ही गावात दारूबंदी चळवळी संदर्भात आंदोलन करत असतो. असे सामाजिक प्रश्न आम्ही हाताळतो पण आमच्या महिलांनी केलेल्या कामात फार काही न्यूजव्हल्यू नसल्यामुळे त्याच्या बातम्या येत नाहीत. पण आमच्या कार्यकर्त्यांनी ट्रकची पेटवलेली टायरे याची न्यूजव्हल्यू जास्त असल्यामुळे त्याच्या बातम्या जास्त येतात. पण आमची दोन्ही काम चालू असतात.

प्रश्न - शरद जोशी हे शेतकरी संघटनेचे प्रणेते मानले जातात्त आपणही त्यांच्या सोबत बरेच काळ काम केले आहे. शरद जोशी यांच्या सोबत काम करतानाचा आपला एखादा अनुभव, खास करून तरुण पिढीसाठी ?
उत्तर - शरद जोशी म्हणजे शेतकऱ्याला त्याचा आत्मसन्मान आणि स्वाभिमान मिळवून देणारा एक महामानव होते. त्यांनी शेतीच्या लुटीचे अर्थशास्त्र मांडले आणि सोप्या भाषेत समजावून सांगितले. त्यामुळे लिहता वाचता न येणारे लोक सुद्धा लुटीचा पाढा वाचू लागले. एवढी मोटो ताकद शरद जोशी याच्या कार्यात होती. ते त्या पद्धतीने शेवटपर्यंत जगले. रूढ असताना राजकारणात कराव्या लागणाऱ्या तडजोडी, कदाचित ते राजकारणात यशस्वी झाले नसतील पण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नंतर ताकदीने शेतकऱ्याचे प्रश्न मांडण्याचे काम शरद जोशी यांनी केले. आणि त्या शेतकऱ्याच्या प्रश्नांना जनमान्यता मिळवून देण्यात मला यश आलं.

प्रश्न - साधारणपणे शेतकरी संघटनेच्या स्थापनेनंतर आजपर्यंत शेतकरी संघटनेने आजपर्यंत उस कापूस कांदा यासारख्या पिकाच्या प्रश्नावर भर दिलेला आहे यामुळे शेतकरी संघटना  बागायतदार लोकांची संघटना असा आरोप केला जातो ? यावर आपले काय म्हणणे आहे ?
उत्तर - अस काही नाही. सगळ्याच बाबतीत आम्ही लढत असतो. उस असेल, कापूस असेल. सोयाबीन असेल, हरभर्याचा प्रश्न असेल शेतीसाठीच्या पायाभूत सुविधांच्या आवश्यकता असते तिथे वीज, पाणी असे सगळे लढे आम्ही लढले आहोत. नुकताच तुरीच्या प्रश्नावर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहेत.

प्रश्न - शेतकरी संपाची सुरुवात पुनतांब्या पासून होवूनही शेतकरी संपाचे लोण मराठवाड्यात जास्त पोहचले नाहीत, मराठवाड्यातील शेतकरी चळवळीपासून अलिप्त राहतोय का ? त्याची कारणे काय ?
उत्तर - मुळात हे शेतकरी संप हे आंदोलन फारसे यशस्वी होणार नाही. याची खात्री आमच्या सारख्या अनुभवी लोकांना होती. याच कारण, शेतकऱ्याच पोट हे हातावर असते. त्यामुळे त्याने जर शेतात पेराच केला नाही तर वर्षभर खाणार काय. शेतकऱ्याकडे आर्थिक सक्षमता नाही. उलट शेतकऱ्याची संस्कृती आहे. घरात एखादे प्रेत असेल तर त्यावर राख टाकून आधी तो पेरणी करतो. नंतर अत्यसंस्कार करतो. अशी परंपरा असताना त्याला शेतीकडे पाठ फिरव म्हणून सांगणे. हि कल्पना सांगण्यास मस्त वाटते. पण प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे अवघड आहे. हे माझी सारख्या अनेक अनुभवी माणसास माहित होत. पण त्याचा आधी  कधी  फारसा विचार केलेला नव्हता. पण काही तरुण मुलांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रान तयार केलेले होते. फक्त त्यांचा भ्रमनिरास होवू नये म्हणून म्हणून आम्ही त्यांना पूरक भूमिका घेवून आंदोलनाला ताकद देण्याचा प्रयत्न केला. अर्थात शेतकरी संपाचा अर्थ आम्ही असा लावला कि शहराच्या दिशेने शेतीमाल जावून द्यायचा नाही. मराठवाड्यात, विदर्भात त्याला फारसा प्रदिसाद मिळाला नाही. याच कारण मराठवाडा आणि विदर्भ या भागात जिरायती शेती  केली जाते. त्यावेळी कापण्याची वेळ नसल्यामुळे शहराकडे जाणार धन्य कस रोखणार.  पश्चिम महाराष्ट्रात याला साथ मिळाली याच कारण पश्चिम महाराष्ट्रात शहराकडे जाणार दुध, भाजीपाला, फळ रोखता आली. त्यामुळे आंदोलनाचे अस्तित्व पश्विम महार्सष्ट्रात जास्त दिसलं, विदर्भ मराठवाड्यात कमी दिसलं.

प्रश्न -  शेतकरी संप उत्फूर्त होता कि काही विरोधकांचा दबावतंत्राचा भाग होता ?
उत्तर - या संपाचा आणि विरोधकांचा काही सबंध नाही. हे शेतकऱ्याच्या पोरांनी केलेले बंड होत.

प्रश्न - सरकारमध्ये सहभागी असताना स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकर्याचे प्रश्न सोडवण्यासाठी कितीपत यशस्वी झाली ? नसेल तर का ?
उत्तर - शेतकरी संप व्हायच्या आधीच कर्जमुक्ती च्या मागणीसाठी मी आत्मक्लेश केला होता. म्हणजे या सरकारला पाठिंबा दिला, सरकारला मत द्या म्हणून लोकांना सांगितलं. हि चूक माझ्या हातून घडलेली आहे. याच प्रायश्चित घेण्यासाठी म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांची माफी मागून पुण्यातून मुंबईपर्यत चालत चालत स्वताच्या शरीराला इजा घेवून त्रास दिला. आत्मक्लेश करून त्याच प्रायश्चित्त घेतलं. त्याच्या पाठीमागे जनजागृती करणे हा उद्देश होता आणि हा उद्देश मोठूया प्रमाणात यशस्वी झाला आहे. त्या आत्मक्लेश यात्रेचे परिणाम म्हणजे पुंणताब्याच्या आंदोलनाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मिळालेला प्रतिसाद.

प्रश्न - कर्जमाफी नाही कर्जमुक्ती अशी शेतकरी संघटनेची मूळ भूमिका होती. भाजपा सरकार आल्यवर सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांनी हीच भूमिका मांडली होती पण आज सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे ? याने खरेच शेतकरी प्रश्न मार्गी लागतील का ?
उत्तर - कर्जमाफी हा शब्द रूढ झाला आहे म्हणून पण कर कर्जमुक्ती हाच मूळ उद्देश आहे. माफी गुन्हेगाराला द्यायची असते. शेतकऱ्याने शेती केली, त्यासाठी कर्ज घेतलं हा काय गुन्हा केला का ? त्याला माफी कशासाठी द्यायची. त्याला मुक्तीच दिली पाहिजे. मुक्ती देण्याच कारण अस आहे कि त्याच्या डोक्यावर जे कर्ज आहे. ते धोरणांचा परिपाक आहे. उदाहरनार्थ गेल्या साडेतीन चार वर्षात परदेशातून आयात वाढली आहे. पूर्वी २८ हजार कोटींची होती. ती आता एक लाख चाळीस हजार कोटीपर्यंत वाढली. एवढ्या मोठ्या प्रमाणात बाहेरच्या देशातून अन्नधान्याची आयात केली गेली. याउलट भारतातून परदेशात निर्यात होणारा शेतीमाल होता तो ४२ हजार डॉलर वरून ३६ हजार डॉलर वर आला. म्हणजे १० हजार डॉलरने निर्यात कमी झाली. बाजार हा भावनेवर चालत नाही तो मागणी पुरवठ्याच्या सिद्धतावर चालतो. बाहेरून मोठ्या प्रमाणात आयात झाली. देशातून बाहेर जाणारा माल कमी झाला.  त्याचा परिणाम म्हणून शेतीमालाचा भाव कमी झाला. पाच लाख टन डाळ आयात केल्यामुळे असेल, खाद्यतेल आयात केल्यामुळे सोयाबीनचे पडलेले दर असतील.
या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून ज्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर नऊ लाख कोटींचे कर्ज होत. त्याच शेतकऱ्यांच्या डोक्यावर गेल्या तीन वर्षात साडेबारा लाख कोटीचे कर्ज झाल म्हणजे साडेतीन लाख कोटी कर्ज वाढले. याच कारण म्हणजे अन्नधान्याच्या किमती कमी झाल्या, खतांच्या किंमती वाढल्या. त्यामुळे उत्पादन खर्च वाढला. या सगळ्याचे पर्यवसान शेतकरी कर्जबाजारी होण्यात झालं. एकप्रकारे कृत्रिमरीतीने दर पडल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला. म्हणून त्या कर्जाची जबाबदारी सरकारची आहे. त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे. शेतकऱ्याचा सातबारा कोरा केला पाहिजे. शेतकऱ्याला कर्जातून मुक्ती द्यावी आणि पुन्हा तो कर्जबाजरी होवू नये. म्हणून २०१४ च्या लोकसभेच्या प्रचारात मोदींनी दिलेल्या आश्वासनानुसार उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव सरकारने द्यावा. मग शेतकरी कर्जबाजारी होण्याच कारण नाही आणि शेतकऱ्याला कोणाकडे भिक मागायला जाण्याची गरज नाही. हि आमची भूमिका आहे.

प्रश्न - आता सरकारने  जी कर्जमाफी केली यातून खरेच शेतकरी प्रश्न मार्गी लागतील का ?
उत्तर - आता जी कर्जमाफी झाली त्यात आकडे फुगवून सांगितले जात आहेत. ३४ हजार कोटी जो आकडा सांगितला जातो आहे ५-७ हजार कोटी एवढाच असेल. त्याला निकष अटी एवढ्या लावल्या आहेत. त्यामुळे बहुसंख्य लोक आपोआपच बाहेर जातील.

प्रश्न -  दुसरीकडे १० लाख शेतकरी बोगस आहेत, अस म्हटलं जाते आहे ?
उत्तर - आपल्याकडे मुळात शेतकरी शब्दाची व्याख्याच चुकीची आहे. ज्याच्या नावावर शेती त्याला शेतकरी म्हणाल्यास अनेक उद्योगपतीची जमीन आहे, अनेक नेत्यांच्या जमिनी आहेत. पण आमच्या दृष्टीने शेतकऱ्याची व्याख्या आहे. ती म्हणजे जे कुटुंब निव्वळ शेतीवर जगते. ज्याला दुसऱ्या उत्पन्नाचे साधन नाही. त्याला आम्ही शेतकरी म्हणतो. त्यामुळे बोगस म्हणजे नक्की काय याची स्पष्टता करायला हवी.

प्रश्न - महाराष्ट्रत शेतकरी आत्महत्या हा कायमच न सुटणारा प्रश्न झाला आहे . आपल्यापेक्षा मागास असलेल्या बिहार राज्यात आपल्या पेक्षा शेतकरी आत्महत्येच प्रमाण कमी आहे, याची कारणे काय?
उत्तर - शेतकरी आत्महत्या या देशभर सगळीकडे होत आहेत. पण महाराष्ट्रातले लोक जागरूक आहेत. त्यामुळे ते आत्महत्या झाली कि ते ज्या कारणासाठी आत्महत्या झाली त्या कारणामध्ये नोंद केली जाते. बिहार सारख्या राज्यात हे लपवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि आमच्या राज्यात शेतकरी आत्महत्या होत नाहीत. असं भासवल जाते आहे. मी सगळा देश फिरलो आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात गेलो आहे. सगळीकडे परिस्थिती भीषण आहे.

प्रश्न -  महाराष्ट्रच्या राजकारणात आघाडी युतीला पर्याय म्हणून आपणास तिसर्या धृवाची गरज वाटते का ? यासाठी आपण प्रयत्न करता आहात का ?
उत्तर - सध्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा आणि स्वामिनाथन यांच्या सूत्रानुसार हमीभाव या दोनच प्रश्नांवर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी देशभरातल्या शेतकरी संघटना एकत्रित केलेल्या आहेत. याच्या मध्ये कुठेतरी आम्ही सगळ्याच राजकीय पक्षापासून समान अंतरावर राहण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वात आधी आम्ही शेतकऱ्यांना एकजूट करणार आहोत. आणि राज्यकर्त्यांना मतपेटीचीच भाषा कळणार असल्यास त्या भाषेतही आम्ही बोलायला कमी करणार नाही.

प्रश्न - रिपब्लिकन चळवळीप्रमाणे शेतकरी चळवळीला फुटीचा शाप लागला आहे, अस म्हणता येईल का ? याची नेमकी करणे काय ?
उत्तर - अश्या अनेक पक्षात, सामाजिक संघटनामध्ये फाटाफुटी झालेल्या आहेत. महाराष्ट्राला किंवा देशाला ते नवीन नाही. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचेही तुकडे झाले आहेत. अगदी पत्र्काराच्याही अनेक संघटना आहे. सरकारी नोकर तर अगदी तीन साडेतीन टक्के असतानाही त्याच्या भाराभर संघटना आहेत. कामगारच्या अनेक संघटना आहेत.  वेगवेगळ्या पक्षातही फाटाफुट झालेल्या आहेत. सगळ्यात जास्त फाटाफूट झालेला पक्ष कॉंग्रेसच आहे. त्याच्यात कितीवेळा फाटाफूट झाली हे सांगता येणार नाही. त्यानंतर जनता पक्ष, शिवसेना, भाजपा अश्या सगळ्याच पक्षात फाटाफूट झालेली आहे. आपल्याकडे अशी कोणतीच संघटना नाही ज्याच्यात फाटाफूट झाली नाही. कारण सार्वजनिक क्षेत्रात काम करत असताना वेगवेगळ्या दृष्टीने विचार करणारे लोक एकत्र येतात पण काही काळानंतर त्याच्या मध्ये दरार निर्माण होण हे नैसर्गिक आहे. यात काही आश्चर्यकारक नाही. मुद्दा आहे कि ती संघटना, तो पक्ष आपल्या मूळ विचारधारेपासून भरकटला कि नाही हा मुद्दा महत्वाचा आहे. आणि शेतकरी संघटना हि मूळ विचारापासून भरकटली नाही त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही.

प्रश्न - भविष्यात आपण शेतकरी संघटनेच्या एकत्रीकरणासाठी प्रयत्न कराल का ?
उत्तर - देशातल्या १६२ संघटना एकत्रित केलेल्या आहेत. यासाठी प्रयत्न तर चालूच आहेत.

प्रश्न - शेतकर्यासोबत शेतकऱ्यांचे मुलांचे देखील खूप प्रश्न आहेत ? याबाबत आपण काय विचार करता आहेत ? भविष्यात विद्यार्थी संघटनेच्या बांधणीचा विचार करता आहात का ?
उत्तर - सध्या ते प्रश्न आम्हीच हाताळतो आहे. स्पर्धा परीक्षेचा वयोमर्यादा वाढवायचा आंदोलन आम्हीच केल. गेल्याच महिन्यात जिल्हा परिषदेच्या जागा भरण्याच्या राज्यभरात एकाच वेळी परीक्षा घेतली जावी असा पाठपुरावा आम्ही केला त्यात आम्हाला यश मिळाले. तलाठीच्या परीक्षा जिल्हा पातळीवर न होता राज्य पातळीवर MPSC मार्फत एकत्रित व्हावी, अशी कामे आमची चालूच असतात. ते काम आमची विद्यार्थी आघाडी करत असते.

प्रश्न - शेतकरी संघटनेचे सध्या देशाच नेतृत्व तुमच्याकडे आले आहे. आपली भविष्यात नेमकी काय ध्येय धोरणे आहेत ?
उत्तर - शेतकऱ्याला जागृत करून त्याला एकजूट करून दबावगट तयार करणे. राज्यकर्ते कोणत्याही पक्षाचे असो त्यांच्यावर दबाव टाकून धोरणे राबवायला भाग पाडायला पाहिजे. यासाठी शेतकऱ्याचा दबावगट असणे गरजेचे आहे. तो दबावगत तयार करणे हे आमच भविष्यातील आमच धोरण आहे.

पूर्वप्रसिद्धी - पारंबी दिवाळी विशेषांक २०१७ 
मुलाखत आणि शब्दांकन - प्रविण रघुनाथ काळे
मो - ८३०८७९३००७

0 Comments