नातवांची चलती... सामान्य जनतेचे काय ?


महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नातवांची चांगलीच चलती आहे. खरंतर राजकीय वारसदारांना डोक्यावर घेवून फिरायची सवय असणाऱ्या आपल्या जनतेला हे नवीन नाही पण २०१९ च्या निवडणुकीत नातवांनी चांगलीच सक्रियता दाखवली आहे. शरद पवार यांच्याच घरात सध्या दोन नातवांच्या चर्चेने पवार घरातील वातावरण बिनसले की काय अशी शक्यता निर्माण झाली होती. सध्या रोहित आणि पार्थ असे पवारांचे दोन नातू राजकारणात सक्रीय झाले आहेत. दोन वर्षापूर्वी जिल्हा परिषद निवडणुकीला उभा राहून रोहित यांनी आपली दावेदारी मांडली होती. पवारांच्या पुढच्या पिढीचा वारसदार अशी चर्चा होत असतानाच पार्थ अजित पवार राजकारणात सक्रीय झाले, तेही थेट लोकसभेच्या मैदानात.

खरतर पार्थ यांच्या राजकीय प्रवेशाची इतकी चर्चा झाली नसती पण पार्थचा राजकीय प्रवेश गाजला तो आजोबा शरद पवार यांच्या माघारीने , एकाच घरातील किती लोक उभा राहणार, असं म्हणत थेट शरद पवार आजोबांनी आपल्या नातवासाठी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली. एका नातवासाठी पवारांनी माघार घेताच दुसऱ्या नातवाने मात्र पवार आजोबांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा अस वक्तव्य केल आणि पवारच्या घरात संघर्ष उभा राहिला.

पवारांच्या नातवांची चर्चा होत असतानाच नगर मध्ये एका नव्या नातवाच्या प्रवेशाची चर्चा सुरु होती. सुजय विखे यांची. सुजय विखे पुन्हा बाळासाहेब विखे यांचे नातू. लोकसभा जाहीर व्हायच्या आधीच सुजय यांनी लोकसभा लढण्याचे जाहीर केले होते. पण आपला पक्ष कोणता हे मात्र सांगितले नव्हते. त्यात आघाडीच्या जागेत नगरची जागा राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली. विखेच्या नातवाला आपण का मदत करावी या विचाराने पवारांनी जागा सोडण्याचे टाळले. परिणामी सुजय विखे भाजपात सहभागी झाले. त्यांचे वडील राधाकृष्ण विखे मात्र कॉंग्रेस मध्येच राहिले, अजून किती दिवस ते त्या पक्षात राहणार हा देखील महत्वाचा आहे.

या सगळ्यात काल आणखी एका नातवाची भर पडली आहे, ती म्हणजे अकलूजचे रणजितसिंह मोहिते पाटील यांची. राष्ट्रवादी कडून लोकसभेची उमेदवारी मिळत नाही अस दिसताच त्यांनी भाजपची वाट धरली. रणजितसिंह मोहिते हे शंकरराव मोहिते पाटील यांचे नातू. शंकरराव मोहिते यांनी सोलापूरच्या राजकारणात आपला ठसा उमठवला होता. तो विजयसिंह मोहिते यांनी देखील राखला होता. रणजितसिंह मोहिते भाजपात जावून तो कितपत राखतील हा देखील प्रश्न आहे. एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती पाहता जवळपास प्रत्येक जिल्हात नातवांची राजकीय राजकीय सक्रियता वाढली आहे.  हातकणंगणे मधून बाळासाहेब माने यांचे नातू धैर्यशील माने, सांगलीत वसंतदादाचे नातू सक्रीय आहे. म्हणजे नेत्यांच्या घरातील तिसरी पिढी राजकारणात सक्रीय झाली आहे.

याची यादी करायची झाली तर ती तशी खूप मोठी होईल. पण या सगळ्यातून एक बाब मात्र लक्षात घ्यावी लागेल. नेत्यांच्या तिसऱ्या पिढ्या राजकारणात सक्रीय झाल्या. या भावी पिढ्यांच्या मागे तरूण पिढी वारसा हक्काने उभी राहतीय. हे मात्र अवघड आहे. आता या नव्या पिढ्या आमदार खासदार म्हणून निवडून जातील. पण या नेतांचा झेंडा खांद्यावर घेवून फिरणाऱ्या सामान्य जनतेचे काय ? 

0 Comments