युवक प्रतिभावंत...

काही दिवसापुर्वी पुण्यात आम्ही एक एकदिवसीय विद्यार्थी साहित्य संमेलन आयोजित केले होते. महाराष्ट्रात आजवर अनेक युवा मराठी साहित्य संमेलन भरवली गेलीतच कि... याचा सगळ्याचा एकच उद्देश होता. युवा लेखकांनी नवनवीन साहित्य निर्मिती करावी. अश्या साहित्य संमेलनांची कितीतरी उदाहरणे सांगता येतील. प्रतिभासंगम विद्यार्थी साहित्य संमेलन, अग्निपंख युवा साहित्य संमेलन, समरसतावादी विद्यार्थी साहित्य संमेलन, मराठवाडा युवा साहित्य संमेलन अशी अनेक युवा साहित्य संमेलन आयोजली गेली. या सगळ्याच्या वरती मात्र महाराष्ट्र सरकारने घोषणा केलेल्या युवा साहित्य संमेलनाचा मात्र कुठेच पत्ता लागत नाही. हे दुर्दैव म्हणावे लागेल. यावर सरकारी पातळीवर दुर्लक्ष होत असलं तरी अनेक संस्था, व्यक्ती तरुणाच्या प्रतिभेला वाव देण्याच काम करत आहेत, हि आनंदाची बाब म्हणता येते.

युवक आणि युवक साहित्य याची चर्चा होत असते, ती नेहमीचच आहे. पण युवकाच्या साहित्य चळवळी उभ्या राहाव्यात म्हणून प्रयत्न मात्र शून्य होताना दिसतात. जगाच्या, भारताच्या किंवा अगदी महाराष्ट्राच्या इतिहासात डोकावून पाहिलं कि दिसत जगाच्या प्रत्येक परिवर्तनाच्या क्रांतीत तरुण लेखक विचारवंताचाच महत्त्वाचा सहभाग राहिला आहे. ज्ञानेश्वरांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहली. अशी कित्येक उदाहरणे इतिहासाच्या पानापानात सापडतील. इतिहासाच्या प्रत्येक काळात तरुण पिढीने प्रस्थापित समाजवर्गासमोर आव्हान उभे केले आहे. आज मात्र या सगळ्यात कुठेतरी खंड पडला कि काय असे वाटते.  पण याचा अर्थ असाही नाही कि तरूण पिढी शांत, निर्धास्त आहे. आजचा तरुण पैसा आणि करिअर याच्या मागे धावता धावता साहित्य, कला हेच काय समजापासूनही दूर जातोय कि काय अस वाटतय. आज भारत देश हा जगातला सर्वाधिक तरुण असलेला देश मानला जातो. त्या तरुण पिढीला योग्य दिशा देण्याच काम करण्याची गरज आहे.

मी कविता लिहायला लागलो कधीतरी अधून मधून फेसबुकवरती त्या शेअर करत असतो. त्या कविता वाचून एक पन्नाशी पार केलेले काका सांगत होते, चांगल्या कविता लिहतोस. लिहित राहा. आणि त्या काकांनी ते कॉलेजात असताना कविता लिहित होते, पण त्यावेळी त्यांना कुठे व्यासपीठ न मिळाले नाही. म्हणून लिहण बंद झाल. त्यावेळी लिहलेल्या त्यांच्या कविता एका वहीत बंदिस्त झाल्या. त्या कायमच्याच... त्यावेळी मी विचार केला आज कदाचित फेसबुक सारखी माध्यम नसती तर माझंही लिहण असच एकाद्या वहीत बंदिस्त झाल असत. आज माध्यम बदलली असतील, पण आजही तरुण पिढी लिहते आहे. कागदाच्या पलीकडे जावून मोबाईल, कम्प्युटरच्या कि-बोर्ड तरुण पिढीचे हात सराईतपणे चालताना दिसतात. सोशल मिडिया या तरुण पिढीचा अविभाज्य भाग बनून गेला आहे. दुकानातून पुस्तक घेवून किंवा वही घेवून त्याच्या कागदावर तरुण पिढी लिहित नसेल पण फेसबुकच्या वोलवर रोज लाखो पोस्ट लिहल्या जातात आणि त्या वाचल्या जातात. त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यातही ऑनलाईन साईटसनी  यात अजून भर घातली आहे. अश्या अनेक साईडना रोज लाखो व्हिजिटर मिळतात. हे वाचणारे सगळे तरुणच आहेत, कारण सोशल मिडिया हे तरुणाच्या अभिव्यक्तीचेच व्यासपीठ आहे.

सोशल मिडिया हे तरुणाचे माध्यम आहे, कारण या पिढीला कोणतीही बंधने नको आहेत. कोणत्याही एका भाषेत किंवा विषयात न अडकता सर्वच प्रकारच साहित्य तरुण पिढी वाचत असते. म्हणूनच आजकाल अनुवादीत साहित्याची मागणी वाढली आहेत. कित्येक इग्रजी लेखकांची पुस्तके लाखोच्या पटीत विकली जातात. जे सगळे लिहणारे-वाचणारे तरुणच आहेत. तेही थेट प्रत्यक्ष त्या ठिकाणाहून... आजवर ग्रामीण भागातून साहित्य क्षेत्रात लिहणारे किती तरुण दिसले आहेत. पण फेसबुक सारख्या माध्यमांनी व्यासपीठ दिल. मग एखादा तरुण रानात पेरणी करतानाचा फोटो टाकून त्यावर लागण स्वप्नाचीअसा स्टेटस टाकतो. हीही त्याची अभिव्यक्तीच आहे. अस म्हणता येईल.

नवीन पिढी लिहते. फेसबुकच्या भिंतीवर का होईना पण तरुण पिढी लिहते. कोणत्यातरी एखाद्या लहानश्या गावातून एखादा मुलगा गावात नक्की काय चालू आहे, हे त्याच्या भाषेत सांगत असतो. एखादा आदिवासी भागातील तरूण कवी तिथली व्यथा मांडत असतो. ऐश्वर्य पाटेकर भुईशास्त्र , रवी कोरडे धूसर झाल असत गाव, वीरा राठोड सेन साई वेस , बालिका ज्ञानदेव माझीनितून सुटतेय गोळी, असे अनेक तरुण कवी व्यक्त होत आहेत. कवितेबरोबरच कादंबरी मधेही अनेकजण लिहित आहेत. सागर कळसाइत कॉलेज गेट आणि लायब्ररी फ्रेंड अश्या दोन कादंबरी लिहतो. श्रुती आवटे सारखी एखादी तरुण मुलगी वयाच्या १५ व्या वर्षी लॉग आउट सारखी कादंबरी लिहते. सुशील धसकटे जोहारप्रसाद कुमठेकर बगळा  असे अनेक तरूण लिहित आहेत. हे सगळे तरुण लेखक दिशादर्शक ठरत आहेत. नव्या माध्यमांचा वापर वाढल्यानंतर तसे नवे पर्याय उभे राहत आहेत. सुभरान, अक्षरनामा, मराठी पिझ्झा, ऐसी अक्षरे, बुकहंगामा.कॉम अशी अनेक नवीन ओनलाईन वेबपोर्टल हि उभी राहत आहेत.

साहित्य हे अभिव्यक्तीचे माध्यम आहे. आज माध्यम बदलली असतील. कागदाच्या पलीकडे जावून लिहल जातंय. भविष्यातही माध्यम बदलली जातील. पण लिहल जाईल. हे नक्की. अस म्हटलं जात, प्रत्येक काळातल्या लेखक, कवीला बोलाव लागत. त्यांनी जर बोलन बंद केल तर काळ सोकावतो, हे कायम ध्यानात ठेवाव लागेल. तरुण पिढीलाही लिहित राहावं लागेल.

-         - प्रविण रघुनाथ काळे
        पूर्वप्रसिद्धी – साहित्य चपराक दिवाळी अंक २०१७

0 Comments