जानेवारी फेब्रुवारी महिने संपत आले की त्याच्या सोबतच काॅलेजमधले 'डे'ज संपून जातात. तसं म्हटलं तर खरतर हे दोन महिनेच काॅलेजमधल्या मुलांसाठी आनंदाचे असतात. कारण या महिन्यातच काॅलेज डे, वेगवेगळ्या स्पर्धा, सांस्कृतिक महोत्सव सगळं याच महिन्यात असते. त्यामुळे हे डे सुरू होतात आणि लगेच संपतातही.
पण काॅलेजमधले हे 'डे'जचे दिवस संपले की सगळ्यांच्याच समोर एक मोठा डोंगर उभा असतो तो म्हणजे 'सबमिशन'. वर्षभर केलेला फक्त टाइमपास आठवतो. ग्रुपमध्ये 'तरी मी सांगत होतो....' अश्या प्रकारचे टोमणे मारायला सुरुवात होते आणि सबमिशनची धावपळ सुरू होते.
वर्षभर काॅलेजच्या पार्किंगमध्ये केलेला टाइमपास, कॅन्टीन मध्ये वन बाय टू करत उगाच वाया घालवलेला वेळ सगळं आठवतं पण तरीपण आता ते सगळं विसरून फाईल, जर्नल्स, असाईनमेंट शोधायची पळापळ सुरू होते. मग वर्षभर चूकूनही न फिरकलेली पावलंही क्लासरूम कडे फिरकू लागतात. वर्गातील संख्या वाढू लागते. शिक्षकांना भेटण्याचा प्रयत्न सुरू होतो. वर्षभर रेग्युलर काॅलेज करणारे लोक शोधून त्यांच्या वह्या काॅपी करण्यासाठी झेरॉक्स शाॅपमधली पण गर्दी वाढू लागते
वर्षभरातला टाइमपास चांगलाच महागात पडलेला दिसतो. आणि मग कानात हेडफोन्स टाकून कोरी पाने काळी-निळी करत रात्र रात्रभर प्रॅक्टिकल, असाईनमेंटची खरडपट्टी चालू राहते. कारण फक्त एकच लक्षात असते, मिशन सबमिशन....
-प्रविण रघुनाथ काळे
0 Comments