मराठीचा जयजयकार...


गझलकार  सुरेश भटांनी लिहून ठेवले आहे,
"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी 
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी"
मराठी भाषा हा मराठी लोकांचा अभिमान आहे. कुसुमाग्रजांनी लिहून ठेवलं आहे "माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दीन, स्वर्गलोकाहून थोर मला हिचे अभिमान" पण आजकाल मराठी भाषेची अवस्था वाईट होत चालली आहे अशी सर्वत्र ओरड ऐकायला मिळती आहे. इंग्रजी माध्यमानी आजच्या तरुण पिढीवर आपले आक्रमण केल्यानंतर तर हि परिस्थिती फारच वाईट होत चालली आहे. अशी चर्चा होताना दिसत आहेत. पण सर्वत्र हीच स्थिती आहे असं म्हणता येणार नाही. आजचा तरुण पिढीची भाषा जरी मिंग्लिश किंवा हिंग्लिश झाली असली तरी मराठी भाषेबद्दल तरुण पिढीच्या मनात ओलावा आहे तो कायमच आहे. असं म्हणता येईल. तो दिसून येतोच. 

मागच्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी होत असलेली युवा मराठी साहित्य संमेलन पहिली तर मराठी भाषेबद्दल आजच्या तरुण पिढीच्या मनातील ओलावा दिसून येतो. सोबत भारतात किंवा भारताबाहेर जगात दुबई, शिकागो अश्या वेगवेळ्या ठिकाणी जी विश्व मराठी साहित्य संमेलन होत आहेत. त्यावरून एकच म्हणता येईल कि मराठी भाषेबद्दल आजच्या तरुण पिढीला प्रेम आहे हेच दिसून येते. 

फ. मुं. शिंदे  एका मुलाखतीत काय म्हणाले होते- "जोवर कीर्तनं रंगतायेत, भजनं घुमतायेत, वारकरी आहेत तोवर तरी मराठीची काळजी करावी असं मला अजिबात वाटत नाही. इंग्रजी माध्यमाच्या शाळांचाही उगाच बाऊ करण्यात अर्थ नाही. आजच्या काळात इंग्रजीची उत्तम जाण हवीच. आणि शाळा इंग्रजी असली तरी घरी मराठीचे संस्कार करता येतातच की... " आणि हे बरोबरच आहे. असं मला वाटत. जगाच्या स्पर्धेत आपल्याला टिकून राहायचं असेल तर जगाची भाषा आपल्याया शिकावीच लागेल पण म्हणून याचा अर्थ असा होत नाही कि आपण मराठी शिकण्याची गरज नाही. इंग्रजी शिकलीच पाहिजे पण सोबत मराठीही आली पाहिजे. असं मला वाटत. 

खरंतर कॉलेजमध्ये जाणाऱ्या कोणत्याही एखाद्या तरुणाला जर शुद्ध मराठी बोलायला सांगितलं तर त्याला सलग दोन वाक्यही मराठी जमणार नाही. अगदी सहज बोलायचं म्हटलं तरी, 'अरे आताच लेक्चर बंक करून निघतोय', यावर काही सोल्युशनच सापडत नाही यार...', असे अनेक इंग्लिश शब्द सहज बोलण्यात येतात. पण मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने तरुण पिढीने जगाच्या स्पर्धेत चालताना आपल्या मातृभाषेबद्दलचही भान ठेवण्याची गरज आहे. 
शेवटी कुसुमाग्रजाच्या दोन ओळी सांगितल्या आहेत, 
"माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा 
हिच्या संगाने जागल्या दर्या खोऱ्यातील शिळा" 
आजवर वेगवेळ्या कारणांनी मराठी भाषेचा डंका वाजतच आहे पण आपणही मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने संकल्प केला पाहिजे कि रोजच्या व्यवहारात आपण दुसऱ्या भाषेतील शब्दाचा  कमीत कमी वापर करून मराठी भाषेचा जयजयकार करू या... 
मराठी भाषा दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा... 

-प्रविण रघुनाथ काळे.

0 Comments