साहेब काल विधानसभेच्या पायर्यावर
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी
जोरजोरात ओरडताना पाहून
तुमच्याबद्दल किती आदर वाटला
साहेब, तुम्हाला आमच्या प्रश्नांसाठी
भांडताना पाहून किती आनंद वाटला
निवडून दिलं आम्हीच तुम्हाला
तवापासून तुम्ही दिसला नाही
मागल्या साली गावात दुष्काळ पडूनसुद्धा
तुम्हाला गावात फिरकावंस वाटलं नाही
पण आतातरी तुम्हाला आमचं
दुःख कळल्यानं बरं वाटलं
साहेब, तुम्हाला आमच्या प्रश्नांसाठी
भांडताना पाहून किती आनंद वाटला
शेजारचा बंड्या म्हणत होत्या
घोषणाबाजी आंदोलन सारं काही खोटं आहे
गरीबांबद्दलचा सारा कळवळा
तुमचं फक्त नाटक आहे
पण खरं सांगतो साहेब
मला नाही वाटत असं
कारण, कालं टिव्हीवर बोलताना
तुमचा किती गळा दाटला
साहेब, तुम्हाला आमच्या प्रश्नांसाठी
भांडताना पाहून किती आनंद वाटला
पारावरती काल चर्चा होती
म्हणत होते सगळेच गावकरी
झालीच जर कर्जमाफी, तर
पह्यले तुमची कर्ज माफ होतील
त्यातून उरले थोडेफार
तर ते लोकांपर्यत पोहचतील
त्यातलेही अर्धे-निम्मे तुमच्याच खिशात जातील
पण खरंच सांगतो साहेब
मला अजून समजंना झालंय
कारखाना, गिरणी, डेअरी
सगळं तुमच्याच ताब्यात आहे
एवढंच नाही तर सोसायटीचा चेरमनही
तुम्ही तुमच्याच घरातला घातला
तरीही तुमच्या अंगावरचा
कर्जाचा डोंगर असा वाढला
साहेब, तुम्हाला आमच्या प्रश्नांसाठी
भांडताना पाहून किती आनंद वाटला
मागल्या साली गावात साहेब
दहा आत्महत्या झालत्या
तवांच तुम्ही कर्जमाफी करणार
अश्या घोषणा केलत्या
तवापासून आजवर निसत्या
चर्चाच चालू हुत्या
झेडपीच्या इलेक्शनला तुम्ही
जिंकल्यावर कर्जमाफी आणणार
अशी घोषणा केली होती
तरीही तुम्ही इलेक्शन हारला
मग मातुर तुम्ही कर्जमाफी आणणार
याची खातरी वाटना
पण काल विधानसभा पायर्यावर
कर्जमाफीसाठी ओरडताना पाहून
किती आनंद वाटला
साहेब, तुम्हाला आमच्या प्रश्नांसाठी
भांडताना पाहून किती आनंद वाटला
सरकारकडं पैसा नाही
कालं मुख्यमंत्री सांगत होते
साहेब, तसं कायतरी असेलही
पण तरीही तुम्ही कायतरी मार्ग करा
शेतकऱ्यांच्या डोक्यावरची कर्जाची
टांगती तलवार जरा तुमच्या डोक्यावर धरा
साहेब, पडलीय गरज तर
केंद्र सरकार, वर्ल्ड बॅकेकडून
सरकारकडे लोन करा
नाहीतर असतील तुमचे स्वीस बँकेत
तर तेही थोडे इकडे वर्ग करा
तुमचा लाखावरचा भत्ता
काही दिवस थोडा कमी करा
सरकारी कर्मचार्यांचा पगारावरचा
एखादा शुन्य कमी करा
तरीही नाही जमलंच साहेब तर
निदान FDI आणून का होईना
शेतकऱ्यांच्या कर्जावर थोडी गुंतवणूक करा
पण हात जोडून सांगतो साहेब
शेतकऱ्यांच्या गळ्यातला
कर्जाचा फास तेवढा दूर करा...
कर्जाचा फास तेवढा दूर करा...
0 Comments