सध्या पुण्यात सामाजिक भावनेतून एक नवीन उपक्रम चालू आहे. " एक मुठ धान्य " शहरात आजपर्यंत खेड्यातून येणारं धान्य खाणारे शहरी लोक दुष्काळग्रस्त म्हणून खेड्यातल्या गरजूंना मदत करणार आहेत. एकमेकांना मदत करणे ही समाजाची रितच आहे पण याच गोष्टीचा जेव्हा दुसर्या बाजूने विचार केला तर लक्षात येईल कि जो धान्य उत्पादक शेतकरी आहे त्यालाच आज धान्याची मदत मिळणार आहे आणि धान्य उत्पादक शेतकरीवर्गाला त्याची गरज भासली. यासारखं दुर्दैव नाही. म्हणून त्यावर काहीतरी लिहावं वाटलं म्हणून..
महाराष्ट्रात सध्या अशी परिस्थिती आहे की 'नेमेची येतो हा पावसाळा' म्हणण्याऐवजी 'नेहमीच असतो आमच्याकडे दुष्काळ' असं म्हणावं अशी बिकट परिस्थिती सध्या आमच्याकडे आहे. यावर्षी तर पावसाने दडी मारल्याने तर दुष्काळाने बिकट अवस्था आणली. शेती ओसाड झाली आणि शेतकरी हतबल..
दुष्काळाने धुमाकूळ घातला अनेक शेतक-यांचे जेवणाचेही वांदे व्हावेत. अशी गंभीर समस्या निर्माण झाली. नाना मकरंद अनासपुरे सारखी मानसे अश्रू पुसायला उभी राहिली. समाजाला जाग आली. गणेशोत्सव मंडळानी पुढाकार घेतला. त्यातून एक नवा उपक्रम उभा राहिला "एक मुठ धान्य" अश्या सामाजिक उपक्रमांना आपल्याकडे नेहमीच लोकांचा चांगला प्रतिसाद असतो. तो असायलाही हवा. शहरातील लोक याच्याकडे एक मदत म्हणून पाहतील. दुसरीकडे एक शेतकरी म्हणून याच्याकडे पाहिले तर मनाची तगमग होईल, हे नक्की..
मुळात जो धान्य उत्पादक शेतकरी आहे त्यालाच मदत म्हणून धान्य घेण्याची परिस्थिती यावी, यासारखी दुसरी दुर्दैवी घटणाच असणार नाही. असं मी मानतो. एखादी अतिशयोक्ती व्हावी असा हा प्रकार आहे. म्हणजे एखाद्या कपड्यांच्या दुकानदाराने आपल्या कपड्यांसाठी दुसर्याकडून कापड आणावे. असं म्हणता येईल. कारण जो धान्य पिकवतो त्यालाच आज धान्य शहरातून लोक पाठवणार आहे. ज्या शहरात धान्य पिकतच नाही.
दुसरीकडे यामागची कारणेही अनेक आहेत. आपल्या कडच्या राजकीय शक्तीनी न केलेला विकास, निसर्गाने केलेला आघात. पण यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्याची गरज आहे. कारण आजकाल दुष्काळ नेहमीचाच झालाय. जवळजवळ दरवर्षीच शेतकरी दुष्काळाच्या फेऱ्यात अडकतोय. यावर एक मुठ धान्य किती पुरणार. असाही विचार करायला हवा. पण असो कांदा महागला कि त्याचे खापर फोडून मोकळे होणारे लोक निदान शेतक-यांना मदत करायला उभा तरी राहीला.
शेवटी शहरातल्या उच्चशिक्षित, सुसंस्कुत समाजाने एक मुठ धान्य प्रमाणे शेतकरी वर्गाच्या विकासासाठी थोडा थोडा वेळ जरी दिला तरी शेतक-यांची स्थिती बदलण्यास वेळ लागणार नाही. एवढा विश्वास आहे...
- प्रविण रघुनाथ काळे
0 Comments