रिओ... मागचे काही दिवस या शहराच्या नावाभोवती खूप मोठं वलय होत. खेळांचा महाकुंभमेळा तिथे भरला होता. जगातल्या सगळ्या देशातील खेळाडू आपापले भविष्य आजमावण्यासाठी तिथे जमले होते. ह्या वेळेस प्रथमच देश नसलेले काही खेळाडू तिथे जमले होते. हेही विशेषच...
स्पर्धा संपताना शेवटी पडतालिकेवर नजर टाकताना भारतीय नागरिक म्हणून भारत देशाचं नाव कुठे आहे, हे आपण शोधत राहतो. १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या भारत देशाला पदके किती... २ फक्त. यापलीकडे १२५ कोटी लोकसंख्याच्या देशातून ऑलम्पिक संघ गेला ११८ जणांचा. त्यातून परत पदकांची काय अपेक्षा.
देशात किंवा देशाबाहेर कुठेतरी खेळाचं वातावरण निर्माण झालं कि मलाही माझ्या लहानपणीच्या आठवणी आठवतात. लहानपणी मला असं कोणत्याच खेळात विशेष असं प्राविण्य दाखवता आलं नाही. काही खेळ कसे खेळतात कसे हे मला अजून सांगता येणार नाही. कुठेतरी शाळेत असताना क्रिकेटची बॅट मी काही काळासाठी हातात धरली पण नंतर मला स्वतःला जाणीव झाली यात आपल्याला विशेष असं काही करता येत नाही म्हणून त्यावेळी तीही क्रिकेटची बॅटही सुटली ती कायमची आणि खेळाचा आणि माझाही संबंध संपला तो कायमचा... अशीच काही स्थिती माझ्या सारख्या अनेकांची आपल्याकडे आहे. हे नक्की.
ऑलम्पिक चालू असताना एका मित्राने फेसबुक पोस्ट लिहली होती "जोपर्यंत गणित / विज्ञान चे शिक्षक P.T. चे तास मागून घेतील तोपर्यंत हे असेच चालत राहील. मग मनात विचार येतो देशात टॅलेंटची कमी आहे कुठे ? पण ते शोधणार कोण ? पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी जेव्हा पुण्यात फर्ग्युसन कॉलेज मध्ये केलेलं भाषण काही दिवसापूर्वी व्हाट्स अप वर आलं होत. "इतका मोठा देश पण सुवर्ण पदक नाही मिळालं. कधी याचा विचार केला आहे. कधी यासाठी आपल्या युवा पिढीला आपण त्यासाठी वेळ दिला आहे का ? आपण फक्त सैन्याचा विचार केला आहे. फक्त सैन्यातून खेळाची आवड असणारे बाजूला काढून त्यांना ट्रेनिंग दिले कि त्यातून ५-१० मेडल सेनेचे जवान आणून देतील. " आज मोदी पंतप्रधान आहेत मग तरी किती पदके मिळाली. देशात टॅलेन्ट कुठे कमी आहे. गावागावात गुरामागे फिरताना गलोलीने उडत्या पक्षांचा वेध घेणारे अनेक नेमबाजपटू आपल्याकडे आहेत कि... पण प्रश्न आहे ते शोधण्याचा... त्यांना प्रोत्साहन देण्याचा.
ऑलम्पिक चालू असताना एका लेखिकेने लिहले कि खेळाडू सेल्फी काढायला परदेशात जातात. यातून खेळाबद्दलची मानसिकता दिसून येते. खेळाबद्दल हि मानसिकता प्रथम बदलावी लागेल. तर इथून नवे खेळाडू घडतील. १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या भारतातून ११८ जणांचा संघ जातो. याचा जरी गुणोत्तर काढणं तरी ते किती निघेल. हे सगळं बदलण्यासाठी इथल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्याला मनात खेळ मनात रुजवावा लागेल. तो रुजला कि तो फुलेल. तो व्यवस्थित फुलला तर त्याला पदकरूपी फळे येतील. आणि हि पदकरुपी फळ येण्यासाठी मनात खेळ रुजवावा लागेल. म्हणून खेळ मनात रुजवा...
- प्रविण रघुनाथ काळे
0 Comments