आम्हीही वाचत असतो...

वाचन प्रेरणा दिवस विशेष 
    आम्हीही वाचत असतो... 
         मागच्या वर्षापासून देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस "वाचन प्रेरणा दिवस" म्हणून साजरा केला जातो. आजकालची पोर वाचत नाहीत, सतत त्या मोबाईल मध्ये गुंतून पडलेली असतात. अशी ओरड सगळेच करत असतात. पण त्यावेळी एक गोष्ट मात्र कधीच लक्षात घेतली जात नाही. बाजारात काही लेखकांची पुस्तके लाखोच्या संख्येत विकली जातात. ती वाचली जातात. ई-बुक्स साईट वरून हजारो ई-बुक्स डाऊनलोड केली जातात. सोबत काही ब्लॉगनां लाखो व्हिजीटर भेट देतात. हे सगळे वाचणारे तरुणच आहेत कि... आणि हाच पुरावा आहे तरुण पिढी वाचते याचा... 
         आजच्या तुमच्या-माझ्या या तरुण पिढीतील काहीसा घटक पुस्तक वाचत नसेलही. पण याच पिढीतला एक मोठा घटक रोज असंख्य पुस्तके वाचतो आहे. आपल्या आवडत्या लेखकांच्या पुस्तकांची अनेकजण आतुरतेने वाट पाहत असतात. म्हणूनच चेतन भगतचे वन इंडियन गर्ल हे पुस्तक बाजारात येण्यापूर्वी त्याच्या लाखो पटीत विकले गेले ते उगाच आहे का? चेतन भगत सोबतच रॉबिन शर्मा, दुर्जोय दत्त, सुदीप नगरकर, अमिश त्रिपाठी या इंग्रजी लेखकांची पुस्तके तरुण पिढी वाचते आहेच. मराठी मध्ये सुद्धा व पु काळे, विश्वास पाटील, रणजित देसाई, विश्वास पाटील, वि स खांडेकर व इतर अनेक लेखकांची अनेक एव्हर ग्रीन पुस्तके अजूनही तरुण पिढीच्या मनावर गारुड घालत आहेत. पण सोबत अच्युत गोडबोले, विश्वास नांगरे पाटील या नामांकित लेखकांची पुस्तके देखील तरुण पिढी वाचते आहे. 
         स्मार्टफोनच्या युगात मात्र वाचनाची पद्धत मात्र बदलली आहे. लॅपटॉप, टॅबलेट, किंडलवर हजारो पानांची पुस्तके डाउनलोड करूनही अनेकजण वाचतात. ऑनलाईन ब्लॉगवरून वाचणाऱ्याची संख्या देखील खूप मोठी आहे. बुक हंगामा, मराठीमाती या ऑनलाईन साईटची वाचक संख्या सुद्धा लाखोच्या घरात आहे. फेसबुक, व्हाटसअप जोक्ससोबत रोज अनेक लेखही फॉरवर्ड होत असतात. या सगळ्यामधून देखील वाचक संख्या खूप मोठी आहे हे नक्की. या सगळ्या मधून शेवटी एकच म्हणता येईल, तरुण पिढी वाचते... 
          -प्रविण रघुनाथ काळे

आम्ही काय वाचतो... 
अक्षय जाधव - शासकीय तंत्रनिकेतन पुणे
खरतरं मला विशेष अशी पुस्तके वाचण्यात रस नाही पण बर्याच वेळा अभ्यासाचा कंटाळा आला कि मन मोकळे करण्यासाठी मी पुस्तके वाचतो. चेतन भगत यांची पुस्तके मला विशेष आवडतात. रिव्हालूशन २०२० , कॉलेज गेट नाण्याची तिसरी बाजू ही  पुस्तके  खास आवडले होती.

सागर भालेराव - ढोले पाटील इंजिनिअरिंग कॉलेज. 
मनाला जे भावत ते सगळं लिखाण वाचायला आवडत. प्रामुख्याने प्रेमकथा असणाऱ्या कादंबऱ्या वाचायला आवडतात. त्यामुळे चेतन भगत यांच्या सगळ्या कादंबऱ्या वाचल्या आहेत. त्यासोबत काहीतरी मेसेज देणारी पुस्तके सुद्धा वाचायला आवडतात. 

सोनाली वरटे - बी जे मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग 
खरतर मला लहानपणापासून मला वाचायला आवडते. कॉलेजच्या अभ्यासातून वेळ मिळेल तेव्हा नेहमी वाचत असते. सगळ्याच प्रकारची पुस्तके वाचायला आवडतात. विशेषत मृत्युजंय, २ स्टेटस, श्यामची आई ही पुस्तके जास्त आवडली आहेत. 

हेमश्री अलासे - एस पी कॉलेज 
मला लघुकथा, कादंबरी असं सगळ्याच प्रकारची पुस्तके मला वाचायला आवडतात. लिहायची सवय असल्यामुळे लिहण्यासाठी माहिती आवश्यक म्हणून वेगवेगळ्या विषयावरची पुस्तके वाचते.
प्रकाशित - दैनिक प्रभात, पुणे
१५ ऑक्टोबर २०१६








0 Comments