गाव सोडून ११ वर्ष झाली.
मग कधी कधी मनात प्रश्न पडतो, तसही गावात राहिलो किती
काळ..? पाचवीला असताना गाव सोडलं... वय वर्ष १० असताना...
पुण्यात होस्टेलवर आलो. आता वयाची विशी पूर्ण झाली. होस्टेलच्या जगण्याची सवय झाली,
सगळं स्वतःच करायचं. स्वतःची सगळी काम स्वतः करायची. पण
मनसोक्तपणे... असं वाटत कि मनाला आलं तर करीन नाहीतर राहील पण सांगायला नको, 'अरे हे
असं कर म्हणून... ' पाचवीला आलो पुण्यात आता B. COM चालू आहे लास्ट इयर. भविष्यात पत्रकारितेत उमेदवारी करायची आहे त्यासाठी
प्रयत्न चालू आहेत. पण आजही सहज कोणी बोलता बोलता विचारलं कि कारे इतक्या लहान
वयात गाव सोडलं? पण अजूनही समाधानकारक नेमकं उत्तर मनात
सापडत नाही.
गावात शाळा होतीच कि १०वी
पर्यंतची... पण तरीही घरच्यांची पोराला चांगल्या शाळेत शिकवायची इच्छा आणि मलाही
बाहेर शिकायची इच्छा होती. (असं घरचे सांगतात पण १० वर्षाचा असताना मला किती कळत
होत काय माहित..?) म्हणून पुण्यात आलो. तस गाव
म्हणाल तर डोंगरगाव तालुका सांगोला. १०-१२वी पर्यंतची सगळी वर्ष होस्टेलच्या
नियमांना तडा देत जगलो. तसंच राहायचं असतं खरतर होस्टेलला... तसही होस्टेलवर सगळे
एकाच पंगतीतले घर सोडून पुण्यात आलेले. पण होस्टेलवरचे चांगले वाईट दिवस जगता जगता
मन जुळली, गुन-अवगुण जुळले... आणि त्यातून मैत्री जुळली
नात्यापलीकडे. (तसही हॉस्टेल लाइफ मध्ये
अवगुण जुळल्यावर चांगली मैत्री होते, असं म्हणता येईल.)
आता गावाकडं जाणं होत
वर्षांतून चार- पाच वेळा. तेही १०-१५ दिवसासाठी जास्तीत जास्त एखादा महिना. पण
यामुळे गावची नाळ तुटली असं म्हणता येत नाही. कुठेतरी जाणं येणं कमी झालं कि
थोडासा दुरावा निर्माण होतोच म्हणा. पण इतकी वर्ष पुण्यात राहिल्याने कुठे तरी
पुणे आपलं वाटू लागलं आहे. पण कधीतरी
पुण्याच्या रस्त्यावर फिरताना एखादा सहज विचारतो. गाव कोणतं.. ते सांगोला,
पंढरपूरजवळ... आपण पुणेकर नसल्याची जाणीव. पण घरी गावाला गेलं कि
तिथले लोक विचारतात काय पुणेकर कधी आलात पुण्यावरून... हि आपण हवेत राहत नसल्याची
जाणीव... मग अश्यावेळी मनात प्रश्न पडतो "आम्ही नक्की कुठले...?"
पुण्यात १०-११ वर्ष काढूनही पुणेकर होता आल नाही आणि तेच पुन्हा,
पुण्यात १०-११ वर्ष काढल्याने सोलापूरकर पण होता आलं नाही. पण या
सगळ्या प्रवासात एका गोष्टीची मात्र जाणीव झाली ती म्हणजे या प्रचंड मोठया विश्वात
कुठेतरी आपलं नाव कोरण्यासाठी असं घरदार, गाव सोडून या
विश्वाच्या डोहात उडी तर मारावीच लागेल ना...
- प्रविण रघुनाथ काळे
0 Comments